जेसीबीने उचललेले सेफ्टी ब्रेक – नागरिकांच्या जीवाशी खेळ कोणाचा?
जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसर गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण बनलेले ठिकाण दहा महिन्यांपूर्वी घडलेल्या त्या भीषण अपघाताची आठवण अजूनही शहरवासीय विसरलेले नाहीत. ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू आणि बालकाच्या थरारक बचावानंतर जेव्हा नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला, तेव्हा प्रशासनाने काहीसा विचार करीत रस्त्यावर ‘सेफ्टी ब्रेक’ म्हणजेच गतिरोधक बसवले होते. उद्देश होता या ‘ब्लॅक स्पॉट’वर वेगावर नियंत्रण आणून जीव वाचवणे परंतु आज त्याच नागरिकांच्या जीवाशी पुन्हा निर्दयपणे खेळ केला जात आहे. कारण कुणीतरी ‘जेसीबी’ लावून हे सेफ्टी ब्रेकच काढून टाकले आहेत!
हे फक्त विटा-डांबर काढण्याचे काम नाही; हे म्हणजे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचे धाडस आहे. आणि म्हणूनच नागरिक भडकले आहेत. प्रश्न एकच हा निर्णय कुणाच्या आदेशाने घेतला? कोणाला एवढा आत्मविश्वास मिळाला की तोभर दिवसा जेसीबी घेऊन लोकांच्या जिवाचे रक्षण करणारे सेफ्टी ब्रेक उचलतो? ही बाब केवळ प्रशासनिक दुर्लक्ष नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी केलेला थेट विश्वासघात आहे.
या परिसरातील रस्ता हा जळगावच्या वाहतुकीचा कणा मानला जातो. शिवाजीनगर उड्डाणपूल ते दूध फेडरेशन हा जुना महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. रेल्वे मालधक्का, दूध फेडरेशन, औद्योगिक वाहने, शाळा, वसाहती सर्वच एकाच पट्ट्यात आणि आता तर शहरा बाहेर पडण्यासाठी नवीन बायपास मार्ग कडे जाण्या साठी हाच रस्ता वापरला जातो अशा संवेदनशील ठिकाणी वेग मर्यादित ठेवण्यासाठी जे काही उपाययोजना केल्या गेल्या, त्या काहींना डोळ्यात खुपल्या काय? हा प्रश्न टाळता येणार नाही.
आज नागरिक म्हणतात ज्यांनी जेसीबी लावली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि या जेसीबी धारकास हे कृत्य करण्यास कोणी आदेश दिले हे सेफ्टी ब्रेक काढण्याची काही लेखी परवानगी तपासली का आणि जर असे नसेल तर या प्रभागात राहणारे लोक प्रतिनिधी तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः या ठिकाणी फिर्याद व्हावे आणि ही मागणी योग्य आहे. कारण हा प्रकार अपघात घडविण्याचा कट इतकाच गंभीर आहे. जेसीबी कोणी दिली आदेश कोणी दिला आणि या मागे कोणते हितसंबंध आहेत हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे एखाद्या व्यापाऱ्याचा वाहन मालकांचा, किंवा कोणत्यातरी नेत्याचा दबाव आहे का की महापालिकेतील काही हात या कारवाईत सामील आहेत हे चौकशीतून उघड होणं आवश्यक आहे.
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले असले तरी नागरिकांचा प्रश्न वेगळा आहे चौकशी का थेट एफआयआर का नाही कारण हा प्रकार इतका उघडकीस आला आहे की कोणताही सामान्य नागरिक हे सत्य लपवू शकणार नाही. अपघात झाले की प्रशासन जागं होतं मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली देतं काही दिवस नंतर पुन्हा जुनं धोरण दुर्लक्षाचं.
जळगाव शहरात वाहतुकीचा गोंधळ रस्त्यांवरील बेजबाबदार वेग अनियंत्रित वाहनं आणि अपुरी पायाभूत सुविधा या सगळ्याचं ओझं नागरिकांच्या जीवावर पडतंय ‘सेफ्टी ब्रेक’ म्हणजे केवळ लोखंडी किंवा डांबराचे तुकडे नाहीत ते आहेत लोकांच्या जीवाची हमी. ती हमी आज कुणीतरी आपल्या स्वार्थासाठी काढून घेतली आहे.
महापालिकेने या घटनेत फिर्यादी बनून स्वतःहून गुन्हा दाखल करावा. कारण ही केवळ तक्रार नव्हे ही जबाबदारी आहे. जर महापालिकेनेच मौन बाळगले, तर उद्या कोणतीही व्यक्ती जेसीबी घेऊन शहरातील कुठलेही ‘सेफ्टी ब्रेक’ काढेल रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खणेल आणि प्रशासन ‘चौकशी सुरू आहे’ म्हणून हात झटकत बसेल.
आज नागरिकांचा आवाज प्रशासनाने ऐकला नाही तर उद्या हाच आवाज संतापाच्या ज्वाळा बनून उभा राहील. कारण जेव्हा नागरिकांचा जीव मोलाचा नसतो तेव्हा प्रशासनावरचा विश्वासच मरतो.
दूध फेडरेशन परिसरातील ‘सेफ्टी ब्रेक’ काढण्याचा प्रकार हा जळगावकरांच्या सुरक्षिततेशी केलेला थेट विश्वासघात आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि सेफ्टी ब्रेक तातडीने पुन्हा बसविणे हे प्रशासनाचे नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. अन्यथा पुढील अपघाताचा दोष केवळ जेसीबीवाल्याचा नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेचा ठरेल.
शहराने अनेकदा मृत्यू पाहिला आहे, पण मृत्यूचे निमित्त प्रशासनाची उदासीनता बनू नये — एवढीच अपेक्षा!
