
जनता लाईव्ह:– “अतिक्रमण विरोधी” की “अतिक्रमण संरक्षक” मोहीम?
जळगाव शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईने पुन्हा एकदा दुहेरी मापदंडांचे दर्शन घडवले आहे. आज आकाशवाणी चौक ते महाबळ चौक या दरम्यान सुरू झालेल्या कारवाईत रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, रसवंती, फरसाण व्यावसायिकांना हटवण्यात आले. या लहान उद्योजकांची चूल याच ठेल्यांवर पेटते, पण कारवाईदरम्यान त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.
परंतु याच रस्त्यावर आकाशवाणी चौकातील अपार्टमेंटखाली पक्के बांधकाम असलेले रसवंती, पिझ्झा, चाट भंडारसारखे व्यवसाय मात्र सुखरूप आहेत! नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्याशिवाय महानगरपालिका हलतेही नाही, हे पाहून लोक विचारतात — अतिक्रमणावरील कारवाईसाठी “तक्रार” की “तडजोड” आवश्यक आहे का?
दररोज या मार्गाने निम्म्याहून अधिक अधिकारी येजा करतात, पण त्यांच्या नजरेतून अपार्टमेंटच्या खालील दुकानांमधील पक्के अतिक्रमण आणि रस्त्यावरचे “आरक्षित” पार्किंग अदृश्य होते. म्हणजेच कारवाई फक्त तिथेच जिथे आवाज नाही, आणि मूकांना लक्ष्य करणेच प्रशासनाचे धोरण झाले आहे का, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहतो.
याच पार्श्वभूमीवर सुभाष चौकातील सुवर्ण दुकानासमोर उभा केलेला पक्क्या बांधकामाचा ओटा हे चित्र अधिकच कुरूप बनवतो. रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा ओटा अतिक्रमण नव्हे तर अभिमानाचा विषय असल्याप्रमाणे जपला गेला आहे. मग प्रश्न असा — गरीब विक्रेत्यांच्या कच्च्या शेड्स उखडून टाकणे सोपे आहे, पण पक्के बांधकाम असलेल्या सुवर्ण ओट्याला हात लावायची हिंमत कोण दाखवणार? हात गरीबांवरच का पडतो, आणि श्रीमंतांच्या अंगावरून का सरकतो?
भाजीवाल्याचा ठेला रस्त्यावर आला की तो “अडथळा” मानला जातो, पण सुवर्णवाल्याचा ओटा मात्र “अभिमानाचा चिन्ह”? हे कायद्याचे राज्य आहे की पैशांचे?
महानगरपालिका अधिकारी “शहर स्वच्छतेच्या” घोषणा देत असतात, पण प्रशासनाचा चेहरा या दुटप्पी कारवायांनी अधिकच मलिन होत आहे. नागरिक आता सरळ विचारत आहेत —नियम सर्वांसाठी आहेत की काहींसाठीच खास?
जळगावकरांना आता खोट्या मोहिमांचा नाही, तर खरी पारदर्शक कारवाईची गरज आहे. कारण, लोक म्हणू लागले आहेत —
👉 “जळगावात अतिक्रमण हटत नाही, फक्त निवडक हटवले जाते!”