
जळगाव शहरात अतिक्रमण म्हणजे नेहमीचे चित्र. पण यातही एक वेगळाच तमाशा आहे – गरीब भाजीपाला विक्रेत्याचा ठेला दोन फूट पुढे सरकला तर महापालिका धडक कारवाई करते; पण सोन्याच्या शोरूमधारकाने रस्ताच गिळंकृत केला तरी प्रशासनाचे डोळे सोन्याच्या भावाइतकंच बंद राहतं.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाजवळील परिस्थिती बघितली, तर हा अन्याय डोळ्यात भळभळतो. भाजी विक्रेते, गाडीवाले, हॉकर्स यांना “नो हॉकर्स झोन” ची काठी दाखवून हुसकावले जाते. त्यांचा संसार उध्वस्त होतो. पण याच रस्त्यावर मोठमोठे सोन्याचे शोरूम चक्क पक्के ओटे बांधून मिरवत बसलेले आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या गाड्यांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतलेला असतो. हा रस्ता सोन्याचा शोरूम चा आहे का, की नागरिकांचा?
महापालिका प्रशासन या शोरूमसमोर उभं राहून एखाद्या नम्र चौकीदारासारखं वागतं – गरीबांवर लाठी, श्रीमंतांवर दंडवत. सोन्याच्या भावाप्रमाणे या शोरूमच्या मालकांची दादागिरीही आभाळाला भिडलेली आहे. प्रश्न असा पडतो – शहराचे रस्ते खरेदीला घेतले आहेत का या शोरूमवाल्यांनी? की महापालिकेचे मन व गुप्तरित्या “सोन्याच्या नाण्यांनी” विकत घेतले आहे?
याच शोरूमच्या अजून दुसऱ्या शाखा सुद्धा आहेत आणि या शोरूम वरून त्या शोरूम साठी जाण्याकरता ग्राहकांना ई-रीक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे परंतु या ई रिक्षा सुद्धा या ओट्याच्या पुढे उभ्या केलेल्या असतात म्हणून या शोरूमचा स्वतःचे सुद्धा वाहनांचे अतिक्रमण इथं पाहायला मिळतात.
एक गरीब विक्रेत्याची घराची पायरी जर इंचभर बाहेर आली, तर तिच्यावर बुलडोझर चालवणारे प्रशासन, श्रीमंत व्यापाऱ्यांच्या महाकाय अतिक्रमणाबाबत एवढं गप्प का बसतं? सोन्याचा झगमगाट एवढा अंध करणारा आहे का, की नियमांचा प्रकाशच दिसेनासा होतो?
सध्या नवरात्र उत्सवाची शहरभर गर्दी आहे आणि याच चौकातील रस्त्यावर भवानी मातीचा एक जागृत मंदिर आहे या मंदिरात येणारे भाविक भक्त आपला मार्ग काढत मातेच्या दर्शनासाठी पोहोचताना कसरत करावी लागते आणि हे सर्व करत असताना नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.
–कायदा हा फक्त गरीबांसाठी आहे का?
सोन्याचे शोरूमवाल्यांचे अतिक्रमण कायद्याबाहेर आहे का?
रस्त्यांवर कब्जा करून बसणाऱ्यांना महापालिकेचा शाबासकीचा शिक्का आहे का?
महापालिका जर गरीबांच्या गळ्यात कायद्याची काठी अडकवत असेल, तर मग सोन्याच्या शोरूमवाल्यांच्या मानेवरही त्याच काठीचा बडगा उभारायलाच हवा. नाहीतर हे उघड आहे की – महापालिकेचे कारभार सोन्याच्या तोलामोलाने चालतात.
गरिबांचे अतिक्रमण फोडा, श्रीमंतांचे अतिक्रमण जोडा – अशी दुर्दैवी पद्धत जळगावमध्ये उघडपणे सुरू आहे. हा प्रकार म्हणजे शहर प्रशासनाने नागरिकांच्या डोळ्यांसमोरच केलेला सुवर्ण भ्रष्टाचार आहे.
रस्ते हे सर्वसामान्यांचे आहेत, श्रीमंत व्यापाऱ्यांच्या शोरूमचे नाहीत. कायदा एकाच तराजूत मोजा – नाहीतर नागरिकांच्या रोषाचा बुलडोझर महापालिकेच्या या दुटप्पी कारभारावर चाललाच पाहिजे!