
- गरिबांचे अतिक्रमण – श्रीमंतांचे संरक्षण!
जळगाव शहरातील महानगरपालिका आज अशा वळणावर आली आहे की तिच्या कारभाराकडे पाहून एकच वाक्य डोक्यात घुमते – “गरिबांचे काढूया अतिक्रमण, आणि श्रीमंताचे वंदूया चरण…”
हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्या स्त्रिया असोत, फुलवाले असोत किंवा फेरीवाले – त्यांच्यावर मनपाचे डंडे नेहमीच चालतात. रोजीरोटी मिळवणारी गाडी जप्त, भाजीपाल्याचे ओझे कचऱ्यात, आणि गरिबांचे अश्रू रस्त्यावर… हेच रोजचे दृश्य बनले आहे.
पण दुसऱ्या बाजूला, शहरातील मोठे इलेक्ट्रॉनिक शोरूम, दुचाकींचे मॉल्स, मेडिकल्स – यांची अतिक्रमणे अक्षरशः डोळ्यांत घालावी तशी झळकतात. बॅरिकेट्स रस्त्यावर, फुटपाथ गिळंकृत, ग्राहकांसाठी मोकळा रस्ता व्यापलेला… तरीही मनपा अधिकारी आणि कर्मचारी मुकेबधीरच!
हेच नव्हे तर अशी दुकाने मनपाच्या अवघ्या हद्दीत, त्यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूलाच उभी आहेत. रोज ये–जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे अतिक्रमण दिसत नाही का? की डोळ्यावर पट्टी बांधूनच ते फिरतात? याच रस्त्यावर काही वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या अपघातात एका निरपराध नागरिकाचा बळी गेला होता. त्यातूनही प्रशासनाने धडा घेतलेला नाही.
मनपाच्या या “दुहेरी अंमलबजावणी”मुळे सामान्य नागरिक संतप्त आहेत. गरीबांचा उदरनिर्वाह हिरावून घेणे आणि श्रीमंत व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे – हा अन्याय किती काळ सहन करायचा?
शेवटी एकच सवाल उरतो – ही महानगरपालिका आहे की मनमानी पालिका…