
📰 बीव्हीजी कंपनीला हिरवा झेंडा – शहर मात्र अजूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली!
जनता लाईव्ह :–जळगाव : महानगरपालिकेच्या वतीने बीव्हीजी इंडिया कंपनीला शहराची साफसफाई करण्याचा ठेका देत हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पण नागरिकांचा प्रश्न असा आहे की, “हिरवा झेंडा दाखवला तरी शहर खरंच स्वच्छ झालं का?” उत्तर मात्र ठाम – अजिबात नाही!
महापालिकेच्या आवारालगतच, भिंतीच्या कडेला पडलेला कचऱ्याचा ढिगारा हेच दाखवून देतो की बीव्हीजी कंपनीचं काम केवळ कागदोपत्री आहे. रोज येणारे-जाणारे अधिकारी आणि कर्मचारी हा ढीग पाहतात, पण कुणीच हालचाल करत नाही. मग या कंपनीला हिरवा झेंडा दाखवण्याचा फायदा काय?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळील भाजीपाला बाजारातले दृश्य तर आणखी गंभीर आहे. या बाजारात शहरासोबतच ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी येतात. परंतु बाजारात येणाऱ्यांचं स्वागत होतं ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याने आणि दुर्गंधाने. अशा परिस्थितीत नागरिक विचारतात – “बीव्हीजीच्या सफाईचे डंका वाजवले जात असले तरी आमचं आरोग्य कुठे सुरक्षित आहे?”
मनपा प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं दिली जातात की कचरा व्यवस्थापन सुधारेल. पण ती आश्वासनं केवळ हवेत विरतात. वास्तव हे आहे की बीव्हीजी कंपनीला लाखो रुपयांचा ठेका दिल्यानंतरही शहरातील प्रमुख बाजारपेठा, रस्ते, चौक आणि अगदी महापालिकेच्या आसपासही स्वच्छतेचा लवलेश नाही.
👉 नागरिकांचे सरळ प्रश्न :
- बीव्हीजी कंपनी नेमकं काम करतंय तरी कुठे?
- स्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांना फक्त गंडवलं जातंय का?
- कचरा साफ करण्याऐवजी ठेका उचलणं हा कंपनीचा खरा उद्देश आहे का?
- जळगावकर आता सरळसरळ विचारत आहेत – “बीव्हीजीला हिरवा झेंडा दाखवणं थांबवा, आधी नागरिकांच्या परिसरातून कचऱ्याचे ढीग हटवा!”