
जळगाव : जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) हे खाते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर तातडीने त्यांची बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महत्त्वाच्या पदांपैकी एक मानले जाणारे एलसीबी निरीक्षक पद नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या वर्षी ३१ मे २०२४ रोजी वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर बबन आव्हाड यांची नियुक्ती झाली होती. मात्र, ड्रग्स प्रकरण विधानसभा अधिवेशनात गाजल्यानंतर आव्हाड यांची बदली करण्यात आली व त्यांच्या जागी संदीप पाटील आले. आता पुन्हा वादाच्या छायेत हे पद चर्चेत आले आहे.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी भरसभेत गंभीर आरोप उपस्थित करत संदीप पाटील यांच्यावर एका महिलेकडून शारीरिक शोषणाचे आरोप झाल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निर्णय घेत संदीप पाटील यांची बदली केली. त्यांच्याजागी राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
संपादकीय दृष्टिकोन : एलसीबी या महत्त्वाच्या खात्यावरून वारंवार उठणारे वाद, ड्रग्स प्रकरणांतील गाजलेले मुद्दे, गुटखा–सट्टा व्यवहारातील संगनमताचे आरोप आणि आता शारीरिक शोषणासारखे गंभीर प्रकरण… या सर्वांनी जिल्ह्याच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गुन्हे रोखण्यासाठी स्थापन झालेले खातेच जर सतत वादग्रस्त ठरत असेल, तर सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होणे साहजिक आहे. म्हणूनच, अशा संवेदनशील पदांवर नेमणूक करताना केवळ बदलीपुरता उपाय न ठरता, काटेकोर चौकशी, जबाबदारी निश्चित करणे आणि कठोर कारवाई होणे हीच खरी लोकशाही व न्यायव्यवस्थेची कसोटी आहे.