
सरकारी दालनात प्रमोशनपूर्व जल्लोष – शिस्तीचा बोजवारा
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात मंगळवारी सकाळी एक वेगळाच देखावा पाहायला मिळाला. मुख्य अभियंता जयंत बोरकर यांना पदोन्नतीसंदर्भातील आदेश अद्याप प्राप्त झालेले नसतानाही, त्यांच्या स्वागतासाठी कार्यालय सजविण्यात आले. प्रवेशद्वारापासून केबिनपर्यंत मॅट, रांगोळी, पुष्पवर्षाव, तोरणबांधणी असा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. काही राजकीय व्यक्ती, वकील, अधिकारी व कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पण प्रश्न असा आहे की — शासकीय दालन हे वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्याचे व्यासपीठ आहे का?
या उपक्रमात कार्यालयीन संसाधने व निधी वापरला गेला का याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळालेले नाही. थोड्याच वेळात रांगोळी, कार्पेट व फुलांची उधळण काढून टाकण्यात आली असली तरी या दरम्यान सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाया गेला, फाईल्सपेक्षा फुलांचे बोकेच जास्त दिसू लागले, शुभेच्छुकांची गर्दी वाढली आणि कामकाज ठप्प झाले.
नांदेडमध्ये झालेल्या घटनेनंतर महसूल मंत्र्यांना चौकशीचे आदेश द्यावे लागले होते. शासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कृत्यांवर कारवाईची भाषा केली जाते. मात्र जळगावमधील या प्रसंगाकडे प्रशासन कोणत्या नजरेतून पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शासनाचे कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, खासगी जल्लोषासाठी नाही. पदोन्नतीसारख्या वैयक्तिक प्रसंगांचा उत्सव साजरा करणे चूक नाही, परंतु त्यासाठी शासकीय जागा, वेळ आणि संसाधनांचा वापर होणे हे नियमबाह्य आणि प्रशासनाच्या शिस्तीला धक्का देणारे आहे.
आजचा खरा प्रश्न असा आहे की –
👉 शासन यंत्रणेत अशा प्रकारच्या नियमबाह्य कार्यक्रमांवर लगाम कोण आणणार?
👉 आणि लोकांच्या कामासाठी असलेल्या दालनात फुलांचा वर्षाव की जनतेच्या तक्रारींचा निपटारा, याला प्राधान्य द्यायचे?
शासकीय कार्यालयांची प्रतिमा टिकवायची असेल तर अशा जल्लोषी संस्कृतीला आळा घालणे हीच खरी वेळेची गरज आहे. अन्यथा “कार्यालयीन शिस्त” ही केवळ फलकावर लिहिलेली ओळ राहील आणि नागरिकांचा विश्वास डळमळीत होत जाईल.