
जनता लाईव्ह :–पाळधी–तरसोद बायपासचे काम अपूर्ण असतानाही घाईघाईत एकाच बाजूने सिंगल रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो, हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडलेल्या टँकर अपघातातून स्पष्ट झाले. डिझेलने भरलेल्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण अपघाताने रस्त्याच्या धोकादायक वास्तवाचे दर्शन घडवले.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या घटनेला १२–१३तास उलटूनही घटनास्थळी कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नाही. जळगाव शहर अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही मदत यंत्रणा, ठप्प राहिले. नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत “मदत मिळालीच नाही” अशी तक्रार केली.
एका दिशेने सुरू केलेल्या रस्ता, अव्यवस्थित वाहतूक या गोष्टी एकत्र आल्या की नागरिकांचे जीव अक्षरशः धोक्यात येतात, याचे हे पहिले उदाहरण ठरले. दुर्दैवाने हा पहिला अपघात असला तरी शेवटचा ठरणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रश्न असा आहे की, विकासाच्या नावाखाली नागरिकांना अशा प्रकारे धोक्यात का टाकावे? बायपास पूर्ण न करता घाईघाईत रस्ता खुला करून जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कुणी दिला? कामे अपूर्ण ठेवून फितूर उपाय योजना करणे आणि नंतर दुर्घटनेतून धडा न घेणे ही जबाबदारीशून्य कारभाराची पद्धत थांबलीच पाहिजे.