
जनता लाईव्ह:–जळगाव एमआयडीसी परिसरातील अनेक खाजगी कंपन्या कामगारांच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) कपात करतात. पण ही रक्कम नियमितपणे भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केली जात नाही, अशी धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यामुळे या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे.
कामगारांच्या कष्टाने मिळालेल्या पगारातील रक्कम कपात करून ती निधी कार्यालयात जमा न करणे म्हणजे त्यांच्या भविष्यावर डाका टाकणेच होय. हा निधी म्हणजे निवृत्ती नंतरचा आधार, संकट काळातील आधारवड आणि आयुष्यभराच्या कष्टांचे सुरक्षित कवच आहे. त्या कवचालाच छिद्र पाडण्याचं काम संबंधित कंपन्या करत आहेत आणि त्यावर प्रशासनाने डोळेझाक केली आहे, ही बाब संतापजनक आहे.
मनसेतर्फे अधीक्षक, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, जळगाव यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की —
१) कपात केलेली पण जमा न केलेली रक्कम असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी.
२) संबंधित कंपन्यांना निधी तातडीने जमा करण्याचे आदेश द्यावेत.
३) भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये, याची कडक अंमलबजावणी करावी.
अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, अशी भूमिका मनसेने स्पष्ट केली आहे. “कामगारांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा त्यांचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी लढणे ही आमची बांधिलकी आहे” असा इशाराही देण्यात आला.
या इशाऱ्यावेळी मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक राठोड, साजन पाटील, जितेंद्र पाटील, भूषण ठाकरे, विकास ऐश्वर्या, श्रीराम विकास पात्रे तसेच महिला शाखा अध्यक्षा अनिता कापुरे व लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.
👉 प्रशासनाने आता जागं होऊन कारवाई केली नाही, तर कामगारांच्या घामाचा हा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाने थांबवला जाईल.