
🖊️ जळगावातील अजित पवारांचा पहिला दौरा – रिकाम्या खुर्च्या आणि नाखुश कार्यकर्त्यांचे वास्तव
जनता लाईव्ह :– महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिला दौरा मोठ्या गाजावाजासह रंगविण्यात आला. “इतिहास घडणार, मोठा मेळावा होणार” असा डंका पिटला गेला. पण प्रत्यक्षात जे दृश्य उभे राहिले, ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले – मंडपात खुर्च्या जास्त, कार्यकर्ते मात्र अत्यल्प.
जळगाव जिल्हा हा अजित पवार गटाच्या दृष्टीने बळकट मानला जातो. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ताकदीची असून एक आमदारसुद्धा निवडून आलेला आहे. त्यामुळे पहिल्या दौऱ्यात प्रचंड गर्दी, मोठी शक्तीप्रदर्शनाची अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग झालाच नाही तर अजित पवारांना सभागृहात कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीबद्दल स्वतः भाषणातून खंत व्यक्त करावी लागली. “आपलेच कार्यकर्ते व पदाधिकारी कुरकुर करतात, नाराजी व्यक्त करतात” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्वतःच्याच पक्षातील उणिवा उघड केल्या.
या मेळाव्यातील उपस्थितीवर नजर टाकली तर चित्र अधिक स्पष्ट होते. मंचासमोर दिसले ते फक्त मोजके पदाधिकारी आणि लोक संघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. खरेतर या प्रवेश सोहळ्याचा केंद्रबिंदूही प्रतिभाताई शिंदे होत्या. नंदुरबार-गुजरात बॉर्डरपासून ते मध्य प्रदेश सीमापर्यंत आदिवासी कार्यकर्ते येथे दाखल झाले होते. मात्र त्यांच्या येण्यामागेही “राजकीय निष्ठा नव्हे, तर शेतीसाठी, जमिनीसाठी, राखीसाठी आले” अशा चर्चा रंगल्या. यावरून स्पष्ट होते की, हा जमाव कार्यकर्तेपेक्षा गरजूंनी भरलेला होता.
यातील सर्वात लाजिरवाणे दृश्य तेव्हा दिसले जेव्हा प्रतिभा शिंदे यांनी आपले भाषण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट मंडपातून काढता पाय घेतला. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण अद्याप सुरूही झाले नव्हते. एवढेच काय, इतर मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाही कार्यकर्ते हॉलमधून बाहेर पडले. या घटनेने “मेळाव्यात महत्त्व कोणाला दिले – अजित पवारांना की प्रतिभा शिंदे यांना?” हा प्रश्न अधिक ठळक झाला.
पुढे तर अशी वेळ आली की, लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत आलेल्या आदिवासी महिला-पुरुषांना हात जोडून “कृपया थांबा” अशी विनंती करावी लागली. यावरून स्पष्ट होते की, सभागृहातील प्रमुख भार हा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नियमित कार्यकर्ते व पदाधिकारी जणू ‘उपस्थिती दाखवण्यासाठी’च आले होते.
यातून दोन गंभीर मुद्दे समोर आले —
१) अजित पवारांच्या पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.
२) मेळावा हा पक्षशक्तीपेक्षा एका व्यक्तीच्या प्रवेशाभोवती केंद्रित राहिला.
जळगावातील हा पहिला दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निश्चितच अपेक्षित गती देणारा नव्हता. उलट, जिल्ह्यातील स्वतःच्या पक्षाच्या संघटनात्मक कमकुवतपणाचा आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा आरसा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. मोठ्या गाजावाजाने आयोजित कार्यक्रम “रिकाम्या खुर्च्या” आणि “नाखुश कार्यकर्ते” यामुळे चर्चेचा विषय ठरला, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
लोकशाहीत कार्यकर्ते हे पक्षाचे खरे बळ असतात. परंतु जेव्हा कार्यकर्त्यांचा ओघ हा केवळ एखाद्या खासगी मोर्चाच्या आधारावर दिसतो आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते नाराज होऊन गप्प बसतात, तेव्हा पक्षाची ताकद किती खऱ्या अर्थाने मजबूत आहे याचा अंदाज यावा. जळगावचा मेळावा हे त्याचेच ज्वलंत उदाहरण ठरले.