
जळगाव | प्रतिनिधी ‘कॅफे कॉलेज कट्टा’च्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईत सात जोडपी रंगेहात पकडली गेली असून कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कॅफेवर अचानक छापा टाकला. येथे प्लायवुडचे कप्पे, पडदे लावून अंधारात शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. छाप्यात ३x३ फुट कप्पे, छोटे सोफे आणि अश्लील कृत्यात गुंतलेली सात जोडपी आढळून आली. संबंधितांना बाहेर काढून समज देण्यात आली व त्यांच्या पालकांनाही याची माहिती पोचविण्यात आली.
कॅफेत कॉफी बनविण्यासाठी आवश्यक साहित्य, कॉफी पावडर, साखर, गॅस आदी वस्तू किंवा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे ‘कॉफी शॉप’चा आडोसा घेऊन बेकायदेशीररित्या अश्लील कृत्यांना खतपाणी घालण्याचा प्रकार उघडकीस आला. चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. लाडवंजारी मंगलकार्यालय, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. 287/2025, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१(अ)(क) अंतर्गत सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, SDPO संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात PSI सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, महिला पोलीस शिपाई स्वाती पाटील आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.