पालिकेच्या निष्क्रियतेविरोधात रणसंग्राम; जळगावात उपोषणाला बसले सोनवणे
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी परिसरात दुमजली–तिनमजली घरांची बांधकाम परवानगी व घरपट्टी टॅक्स पावत्यांनुसार असलेल्या बांधीव क्षेत्रफळाचे मोजमाप करून योग्य कर वसुली करण्याची मागणी १४ जुलै रोजीच नगर परिषद प्रशासनाला करण्यात आली होती. त्याचबरोबर या परिसरातील व्यापारासाठी उभारलेल्या दुकानांचा शॉप अॅक्ट परवाना फेरतपासणी करून शासनास योग्य तो कर जमा करण्याचे आणि अतिक्रमण आढळल्यास बांधकाम विभागामार्फत कारवाई करण्याचे निवेदनही देण्यात आले होते.
या सर्व मागण्या स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी, नगर परिषद भुसावळ यांना सादर केल्या होत्या. काही दिवसांनी पुन्हा स्मरणपत्र देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला, मात्र पालिका प्रशासनाने ना कारवाई केली, ना उत्तर देण्याची तसदी घेतली. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सोनवणे यांचा आरोप आहे की, पालिका प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून, करचुकवेगिरी व अतिक्रमणास मूकसंमती देत आहे. घरपट्टी, शॉप अॅक्ट परवाना, आणि बांधकाम परवानगीसंबंधीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असतानाही अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. हे केवळ नियमभंग नव्हे तर नगरपरिषद महसूल गळतीचाही गंभीर प्रकार आहे.
या निष्क्रियतेविरोधात आणि नागरिकांच्या न्यायाच्या मागणीसाठी लढा देत, स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार संघटनेचे मिलिंद सोनवणे यांनी जळगावातील जीएस ग्राउंडवर उपोषण सुरू केले आहे. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.