
देशात स्वातंत्र्याचा 79 वा सुवर्णमहोत्सव; पण वाघ नगरात अजूनही चिखल, गटार आणि अंधारचं राज्य!
जळगाव – एकीकडे देशभरात स्वातंत्र्याचा 79 वा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. लाखो रुपयांचा खर्च करून झेंड्यांची रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांची धूम उडणार आहे. पण जळगाव शहराला लागून असलेल्या सावखेडे शिवारातील वाघ नगरमधील नागरिक मात्र आजही चिखल, गटार आणि अंधारात जीवन जगण्यास मजबूर आहेत.
माऊली नगर रस्त्यावर रोज गटारीचे पाणी रस्त्यातून वाहते. दुर्गंधी, चिखल आणि घाणीने व्यापलेल्या या रस्त्यावरून वयोवृद्ध, शाळकरी मुले आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वाघ नगर हा उच्चशिक्षित नागरिकांचा परिसर असून, इथे कोट्यवधींचे अपार्टमेंट आणि रो हाऊस प्रकल्प धडाधड उभे राहतात. पण या प्रकल्पांना मूलभूत सुविधांचा केवळ फोटोवरच उल्लेख — प्रत्यक्षात मात्र पायाभूत काम शून्य!
बिल्डरांना रस्ते व गटार आधी तयार करण्याची कायदेशीर जबाबदारी असतानाही, पूर्ण झालेल्या घरांना आजही सुविधा नाहीत. तरीही ‘कंप्लेशन सर्टिफिकेट’ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्यच नाही, असा आरोप नागरिक करत आहेत.
ग्रामपंचायत मात्र कर वसुलीत आघाडीवर! कर भरताना नागरिक सुवर्णमहोत्सवात आहेत, पण सुविधा मिळवताना दगडयुगात. ही थेट प्रशासनाची आणि संबंधित पालकमंत्र्यांची ढळढळीत बेपर्वाई आहे.
वाघ नगरातील रहिवाश्यांचा संताप उफाळून आला असून, “आता गप्प बसणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.