
🛑 घंटागाडीतून जैविक घनकचरा संकलन; वॉटर ग्रेस कंपनीवर महापालिकेचा दंड..
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जैविक घनकचरा संकलन आणि साफसफाईचे कंत्राट असलेल्या वॉटर ग्रेस कंपनीकडून मोठ्या प्रमाणात नियमभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका हॉस्पिटलमधून जैविक घनकचरा (बायोमेडिकल वेस्ट) घंटागाडीतून उचलताना कंपनीच्या कामगारांचा व्हिडीओ ६ ऑगस्ट रोजी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसारित झाला असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेने १४ ऑगस्ट २०१९ रोजी वॉटर ग्रेस कंपनीला घनकचरा संकलन, वाहतूक आणि स्वच्छता कामकाजासाठी पाच वर्षांची कंत्राटी नेमणूक दिली होती. सदर कंत्राटाची मुदत १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपुष्टात आली असून, पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे.
मात्र, करारनाम्याच्या अटी क्रमांक ३७ नुसार, घंटागाडीतून कोणत्याही रुग्णालयातील जैविक (बायोमेडिकल) कचऱ्याची वाहतूक करता येणार नाही, अशी स्पष्ट अट असूनही, एम.एच.१९-सी.वाय.३७८१ क्रमांकाच्या वाहनातून कचरा संकलन करण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारात कामगार विना युनिफॉर्ममध्ये आकाशवाणी चौकाजवळील जैन पेट्रोल पंपाजवळ बायोमेडिकल वेस्ट वेगळा करताना आढळले.
या नियमभंगामुळे महानगरपालिकेने वॉटर ग्रेस कंपनीवर ₹५,०००/- इतका दंड ठोठावला आहे. याशिवाय, संबंधित वाहनातील चालक व कामगारांनी कोणत्या रुग्णालयातून हा कचरा संकलित केला याबाबतची माहिती तसेच संबंधित हॉस्पिटलचे नाव, पत्ता आणि कारवाईचा तपशील त्वरीत सादर करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले असून, शहरातील जैविक घनकचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनाबाबत गंभीर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.