
जनता लाईव्ह :–जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता कंत्राट घेऊन कार्यरत असलेली वॉटर ग्रेस कंपनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण अधिक गंभीर आणि आरोग्यास थेट हानिकारक आहे. शहरात फिरणाऱ्या घंटागाडीतून बायोमेडिकल कचरा वाहत असल्याचे वास्तव समोर आले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट संकट निर्माण झाले आहे.
घंटागाडी ही मूळतः ओला आणि सुका कचरा संकलनासाठीच वापरण्यात येते. त्यात वापरलेले इंजेक्शन, सुया, औषधांचे अवशेष, सलाईन बाटल्या अशा संसर्गजन्य वैद्यकीय कचऱ्याचा समावेश हा केवळ नियमभंग नाही, तर नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. Bio-Medical Waste Management Rules, 2016 नुसार बायोमेडिकल कचरा हा बंद वाहनात, Biohazard चिन्हासह, निश्चित प्रक्रियेनुसार वाहिला गेला पाहिजे. हे नियम फाट्यावर मारून घंटागाडीतून तो कचरा हलवला जात असेल, तर ही गंभीर परिस्थिती आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना मनपा आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय कचरा संकलनाचे टेंडर ही जबाबदारी ‘मनसाई’ संस्थेकडे आहे. जर वॉटर ग्रेस कंपनीने ही चूक केली असेल, तर तिच्यावर शर्तभंगाची कारवाई केली जाईल. मात्र, यातील मुख्य प्रश्न हा आहे की — ही बाब निदर्शनास येईपर्यंत प्रशासन झोपलेलेच का होते?
घंटागाडीत काम करणाऱ्या मजुरांची परिस्थिती तर अजूनच भयावह आहे. त्यांच्याकडे हॅण्ड ग्लोज, युनिफॉर्म, मास्क, बायोसेफ्टी उपकरणं यांचा अभाव असून, ते थेट वैद्यकीय कचऱ्याच्या संपर्कात आहेत. हे केवळ मजुरांच्या जीवाशी खेळ नाही, तर कामगार कायद्या आणि मानवतेच्या चौकटीत बसणारा गंभीर अन्याय आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खालील गोष्टी तातडीने घडायला हव्यात:
दोषी कंपनीवर दंडात्मक कारवाई घंटागाडीतील सर्व आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षासाहित्य व प्रशिक्षण बायोमेडिकल कचऱ्याची स्वतंत्र व सुरक्षित वाहतूक यंत्रणा तपासणे.
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी
जळगाव शहरात सध्या डेंग्यू, विषबाधा, साथीचे आजार यांचा धोका वाढलेला असताना, अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मनपा प्रशासनाने याकडे केवळ कारवाईपुरते पाहू नये, तर एक दीर्घकालीन जबाबदारी म्हणून योग्य उपाययोजना करावी, ही वेळेची गरज आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही यंत्रणेवर कारवाई झालीच पाहिजे — ही फक्त अपेक्षा नव्हे, तर नागरी अधिकार आहे.