
जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषद जळगाव येथे गार्ड बोर्ड मंडळामार्फत करण्यात आलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीमध्ये नियमबाह्य पद्धती व लाखोंच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. या भरतीत संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट दस्तावेजांवर सह्या करत गार्ड बोर्डातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून भरती राबविल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनीच मुख्य भूमिका बजावल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केला असून, संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या प्रशासनाचा ९ ऑगस्ट क्रांती दिनी फटाके फोडून निषेध करण्यात येणार आहे.
डॉ. सोनवणे यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून “गार्ड बोर्डकडे जा” अशी उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याचे निवेदनात नमूद आहे.
सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर समोर आले की, गार्ड बोर्डामार्फत नियुक्त रक्षकांबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुनील पाटील यांचे दस्तावेज प्राप्त झाले आहेत. यातूनच जिल्हा परिषद प्रशासनाची गुंतवणूक स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याआधी देखील “शिवा सेक्युरिटी” या कंत्राटदाराकडून सुरक्षा रक्षकांना किमान वेतन न दिल्याची, जीएसटी व व्यवसाय कर बुडवल्याची बाब समोर आली होती. या सर्व प्रकारांची जबाबदारी बांधकाम विभागावर असून, पुन्हा एकदा त्याच विभागाने नियम धाब्यावर बसवत भरती केल्याने गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी फटाके आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.