
जळगाव | प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी हरिश्चंद्र जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगाव) यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्यांच्या निधनाने जळगाव शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
राहत्या घरी गळफास; शोध घेतल्यानंतर उघडकीस घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास ते वरच्या मजल्यावरील खोलीत गेले होते. संध्याकाळी घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह वरच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.
रुग्णालयात सर्वपक्षीय गर्दी; कारण अद्याप अस्पष्ट अनंत जोशी यांच्या निधनाच्या वृत्ताने शहरात शोककळा पसरली. रुग्णालयात सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद सुरू आहे.
अभ्यासू नगरसेवक, आंदोलनप्रिय नेतृत्व बंटी जोशी हे शिवसेना (ठाकरे गट) चे दोन वेळा निवडून आलेले नगरसेवक होते. त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात अनेक जनहितवादी आंदोलनं करून जनतेच्या समस्या अधोरेखित केल्या होत्या. ते अभ्यासू, मनमिळावू व सामाजिक जाण असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जायचे.
कुटुंबातील व्यक्ती व नागरिकांमध्ये हळहळ त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि राजवीर नावाचा एक मुलगा असा परिवार आहे. हसत-खेळत व सदैव सकारात्मक उर्जा देणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणातून अलिप्त होते, हे विशेष.