
जळगाव |
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या जागी तिचा पती काम करत असल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप दोषी ठरले आहेत. या प्रकरणात कारवाईची शिफारस असलेला अहवाल मंगळवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सादर करण्यात आला.
उपायुक्त पंकज गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली होती. संबंधित महिलेच्या पतीने देखील डॉ. घोलप यांच्या सांगण्यावरून आपण काम करत असल्याचे स्पष्ट केले होते.
एक ना दोन, आता तिसरं प्रकरणही समोर
- डॉ. घोलप यांच्यावरील वादग्रस्त प्रकरणांची मालिका थांबताना दिसत नाही.
महापालिकेच्या रुग्णालयातील सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तनप्रकरणी तसेच शाहू महाराज रुग्णालयात रामेश्वर कॉलनी या ठिकाणी सफाई कामगार म्हणून आयुक्तांची दिशाभूल करत नियुक्ती करण्यात आली होती व त्या कर्मचाऱ्यास डाटा एंट्री करण्याचे काम करण्यास लावले होते यात सुद्धा संबंधित कामगाराला दोन वेगवेगळ्या प्रकारचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते हे सर्व काही सुरू असताना महिलेची गैरवर्तन केल्याचे पाचशे रुपयांच्या नोटरी स्वरूपात माफीनामा लिहून देणे म्हणजेच स्वतः लेखी स्वरूपत गुन्ह्याची कबुली दिली होती.
सात महिने प्रलंबित प्रकरण आणि राजकीय आरोप
या प्रकाराला तब्बल सात महिने उलटून गेले असून, अहवाल उशिरा सादर होत असल्याने डॉ. घोलप यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला आहे. अखेर उपायुक्तांकडे सादर झालेला अहवाल मंगळवारी आयुक्तांकडे सुपूर्त करण्यात आला.
डॉ. घोलपांवर कारवाई कधी?
गैरवर्तन, नियमबाह्य नेमणुका आणि आर्थिक व्यवहार या तिन्ही गंभीर प्रकरणांत डॉ. घोलप यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही कारवाई मात्र लांबणीवर टाकली जात आहे. यामुळे प्रशासन डोळेझाक करतंय का? असा सवाल आता शहरात विचारला जात आहे.