
204 दिवसांनी अखेर डॉ. विजय घोलप प्रकरणाचा अहवाल आयुक्तांसमोर; कारवाईकडे जनतेचे लक्ष
जळगाव | महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील वादग्रस्त प्रकरणात अखेर निर्णायक टप्पा आला आहे. एका महिला कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत तिच्या पतीकडून नियमित काम करून घेतल्याचा प्रकार 8 जानेवारी 2025 रोजी आमच्या चॅनलवर वृत्त स्वरूपात समोर आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर चौकशीसाठी तात्काळ तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली.
मात्र, तब्बल सहा महिने 22 दिवस म्हणजेच एकूण 204 दिवस उलटूनही समितीचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला नव्हता. यामुळे संबंधित अहवाल दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्याने होत होता.
आमच्या प्रतिनिधी मार्फत या प्रकरणाचा पाठपुरावा करत यामागे प्रशासनातील वरिष्ठांचा हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला होता. अखेर, मंगळवारी समितीने आपला अहवाल उपायुक्त पंकज गोसावी यांच्याकडे सादर केला असून आज बुधवार, 30 जुलै 2025 रोजी तो आयुक्तांकडे अंतिम कारवाईसाठी सादर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेच्या पतीने स्वतः कबूल केले आहे की, “डॉ. विजय घोलप यांच्या सांगण्यावरूनच मी महापालिकेत काम करत होतो.” त्यामुळे चौकशीचा केंद्रबिंदू ठरलेले डॉ. घोलप यांच्याविरोधात काय कारवाई केली जाणार, याकडे आता संपूर्ण शहरवासीयांचे आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
डॉ. विजय घोलप यांच्या कार्यपद्धतीवर आधीपासूनच विविध वाद आणि आरोप सुरू आहेत. त्यामुळे या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त काय निर्णय घेतात, यावर भविष्यातील विश्वासार्हतेचा कस लागणार आहे.