
जळगाव महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश चाटे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन नियुक्ती
जळगाव, दि. १७ जुलै २०२५ – जळगाव महानगरपालिकेत सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले श्री. गणेश चाटे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) आणि ४(५) अन्वये ही कारवाई केली आहे.
श्री. चाटे यांना दि. १६ जुलै २०२५ पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांची नियुक्ती गट-ब संवर्गातील सहायक आयुक्त या पदावर, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी दि. १७ जुलै २०२५ रोजी नवीन पदावर कार्यभार स्वीकारावा आणि तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रशासकीय बदल्यामुळे जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.