
सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी परिसरातील घरांची कर वसुली, बांधकाम परवानगी व अतिक्रमणाबाबत चौकशीची मागणी
भुसावळ, ता. १४ जुलै २०२५ – भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर व नवजीवन सोसायटी या भागांतील बांधकामे, घरपट्टी कर, असेसमेंट, तसेच अतिक्रमणाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य (रजि. नं. 125263) चे भुसावळ तालुकाध्यक्ष श्री. मिलिंद रामचंद्र सोनवणे यांनी एक लेखी निवेदनाद्वारे भुसावळ नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर परिसरातील अनेक बांधकामे बहुमजली असून – पहिला, दुसरा व तिसरा मजला – या घरांना बांधकाम परवानगी आहे की नाही, याची शहानिशा करण्यात यावी. तसेच त्या घरांवर योग्य कर आकारणी केली गेली आहे का, हे असेसमेंट उताऱ्यांनुसार तपासावे, असे श्री. सोनवणे यांनी नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे, शहरात अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खर्च व मेहनत घेतली असली, तरी परवानगीशिवाय उभ्या असलेल्या घरांवर व दुकानांवर अद्यापही योग्य ती कायदेशीर कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर परिसरातील सर्व दुकानांचे शॉप अॅक्ट परवाने तपासून, जर कोणते अयोग्य वा कालबाह्य असतील, तर त्यावर कार्यवाही करून शासनाच्या महसुलात योग्य कर भरवण्यात यावा, अशी मागणी श्री. सोनवणे यांनी केली आहे.
शासन निर्णय क्रमांक ७४ व इतर संबंधित नियमांनुसार, घरांची मोजणी, क्षेत्रफळ प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी व कर वसुली यासंदर्भात लेखी तपशील निवेदनकर्त्यास द्यावा, तसेच अतिक्रमण विभागास आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.