
जळगावात मनसे-शिवसेना एकत्रित मोर्चा : हिंदी सक्तीविरोधात सरकारचा निर्णय जाहीरपणे फाडला, होळी करून निषेध
जळगाव (प्रतिनिधी) :
राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच, या चर्चेला प्रत्यक्ष कृतीतून बळ मिळाल्याचे चित्र आज जळगाव शहरात पाहायला मिळाले.
मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले :
“मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रश्न आहे हा. सरकारने हिंदी सक्तीच्या नावाखाली मराठी भाषेला दुय्यम वागणूक देण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. आज जळगावच्या रस्त्यांवर शिवसेना आणि मनसे एकत्र आली, हे मराठी जनतेसाठी नवे पर्व सुरू होण्याचे संकेत आहेत. पक्ष कोणताही असो, पण जेव्हा प्रश्न मातृभाषेचा आणि मायबोलीचा असतो, तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र उभे राहतो – आणि हीच खरी मराठी मनाची ओळख आहे.”
“उद्या कुणीही मराठीच्या विरोधात भूमिका घेतली, तर त्याला मराठी जनता रस्त्यावर उतरून उत्तर देईल. हा फक्त आंदोलनाचा प्रारंभ आहे, गरज पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही एकजूट होऊन लढू.”
बाविस्कर यांच्या या वक्तव्याने मनसे-शिवसेना ऐक्याचा संदेश अधिक ठळक झाला असून, राज्यभरात या एकतेची चर्चा सुरू आहे.
या संयुक्त मोर्चात केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविषयक निर्णयाची जाहीर होळी करण्यात आली. शासनाच्या आदेशाच्या प्रतींची होळी करून शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. मराठी भाषा आणि अस्मितेच्या रक्षणासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येत दिलेला हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी सात जुलै रोजी शिवसेनेने नियोजित केलेला हिंदी विरोधी मोर्चा उद्धव ठाकरे यांनी स्थगित करून पाच जुलै रोजी होणाऱ्या मनसेच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन शिवसेना कार्यकर्त्यांना केले होते. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत.
मनसे व शिवसेना सैनिकांची प्रतिक्रिया : “मराठीसाठी आम्ही एक आहोत!”
हिंदी सक्तीच्या विरोधात जळगावात एकत्र काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहात व मराठी अस्मितेच्या ज्वलंत घेऊन सहभागी झाले होते.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे म्हणाले :
“राज ठाकरे साहेबांनी मराठीसाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. आज शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून लढताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. ही केवळ सुरुवात आहे. हिंदी सक्ती चालणार नाही, मराठीची गळचेपी सहन केली जाणार नाही.”
शिवसेना जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील म्हणाले :
“उद्धव साहेबांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही आज मनसेसोबत उभे राहिलो. मराठीचा प्रश्न हा पक्षापेक्षा मोठा आहे. आजचा मोर्चा हा भविष्यातील एकतेचा निर्धार आहे.”
मनसे महानगर अध्यक्ष किरण तळले यांनी म्हटले :
“मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्या रक्षणासाठी मनसे नेहमी पुढे राहिली आहे. शिवसेना देखील मराठीची लढवय्यी परंपरा असलेला पक्ष आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो, ही जनतेसाठी आश्वासक गोष्ट आहे.”
शिवसेना कार्यकर्ते यांची भावना :
“आज आम्ही पक्षभेद विसरून एकत्र आलो. कारण विषय मराठीचा आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.”
मनसे कार्यकर्ते म्हणाले :
“मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी मनसे नेहमी आक्रमक राहिली आहे. आज शिवसेना सोबत असल्याने ताकद दुप्पट झाली आहे. ही एकता टिकून राहावी.”
या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट स्पष्ट होते – मराठीचा मुद्दा येतो तेव्हा पक्षीय भिंती गळून पडतात आणि मनसे-शिवसेना कार्यकर्ते एकत्र उभे राहतात. आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी निर्णायक ठरला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या आंदोलनात मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मराठीसाठी एकत्र आलेले दोन्ही पक्ष आता भविष्यात अधिक गटबांधणी करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगराध्यक्ष किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, राहुल चव्हाण, महिला सेना अनिताताई कापुरे, नेहा चव्हाण, लक्ष्मीताई भील, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, साजन पाटील अविनाश जोशी, प्रदीप पाटील, रोहित माळी, मनोज लोहार, विलास सोनार, राहुल चौधरी, भोला धोबी, तरसोद शहर अध्यक्ष भूषण पाटील, दिनेश कलार, मंगेश भावे, शुभम सैनी, पश्चिम विभाग अध्यक्ष, नौशांक चौधरी, लोकेश ठाकूर, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुसरीकडे, शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनीही या मोर्चाला सक्रीय पाठिंबा दिला.