
जनात लाईव्ह:–जळगाव – महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील लिफ्टमध्ये आज सकाळी नागरिक अडकण्याची धक्कादायक घटना घडली. जवळपास अर्धा तास लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका अखेर करण्यात आली असली, तरी या घटनेने मनपाच्या हलगर्जीपणाची पुन्हा एकदा पक्की साक्ष दिली आहे.
या संदर्भात मनपा अधिकारी संदीप मोरे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मागील दीड वर्षापासून लिफ्टचे कोणतेही ऑडिट झालेले नाही.”
हे स्पष्ट होते की, राज्य शासनाच्या नियमानुसार दर सहा महिन्यांनी लिफ्टचे ऑडिट बंधनकारक असतानाही, महानगरपालिका त्या नियमाला पूर्णतः मूग गिळून गप्प बसली आहे.
हा भोंगळ कारभार नेमका कधी थांबणार?
नियम न पाळणे म्हणजे केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नाही, तर तो नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा गंभीर प्रकार आहे. दररोज लिफ्टचा वापर करणारे कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक यांचा जीव संकटात टाकण्याचा हा सर्रास प्रकार सहन करता येण्याजोगा राहिलेला नाही.
मागणी:
तातडीने लिफ्टचे पूर्ण ऑडिट करून अहवाल जाहीर करण्यात यावा.
संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेख व्यवस्था लागू करावी.
या प्रकरणाकडे आता केवळ दुर्लक्ष न करता ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा या लापरवाहीमुळे भविष्यात एखादा बळी गेला, तर त्याला संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेचीच राहील.