
प्रतिनिधी, जळगाव |
जळगाव महापालिकेत नुकतेच समोर आलेले जन्म-मृत्यू दाखल्यांमधील गंभीर गैरव्यवहार प्रकरण आता कायदेशीर निर्णयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल तयार होऊन सुमारे सहा महिने उलटून गेले असतानाही, अद्याप दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चौकशी अहवाल सध्या विधी विभागाकडे पाठवण्यात आला असून, निर्णयाची प्रतीक्षा अनेकांकडून होत आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
जानेवारी महिन्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इमारतीपैकी एक असलेल्या ठिकाणी एका महिलेच्या जागी त्यांचे पती व शासनाच्या अधिकृत सॉफ्टवेअर हाताळताना आढळून आले. याबाबत प्राप्त व्हिडीओ चित्रणामध्ये निबंधक डॉक्टर विजय घोलप हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी कागदपत्रांत चुकीची माहिती नोंदवली जाणे ही फसवणूक, भ्रष्टाचार व सेवा नियमांची सरळसरळ पायमल्ली मानली जाते.
आयुक्त ढेरे यांचा वरदहस्त?
या गंभीर प्रकाराबाबत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण संबंधित प्रकरणात दोषी आढळून आलेल्या डॉ. विजय घोलप यांना ते पाठीशी घालत असल्याचा आरोप उघडपणे होऊ लागला आहे. इतकेच नव्हे तर, आयुक्तांनी वारंवार या प्रकरणाला ‘किरकोळ बाब’ म्हणून दुर्लक्ष केल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
६ महिन्यांपासून अहवाल प्रलंबित – कारवाई कुठे?
चौकशी समितीने संबंधित प्रकरणात तथ्य आढळल्याचे अहवालात नमूद केले असूनही, अहवालाची अंमलबजावणी वा दोषींवर कारवाई झालेली नाही. महापालिकेतील अंतर्गत हितसंबंध, राजकीय दबाव वा प्रशासकीय अनास्था या गोष्टी या विलंबास कारणीभूत आहेत का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
प्रशासनाचा विश्वासघात – कायदेशीर कारवाई होणार का?
या प्रकरणाचा संपूर्ण तपशील आता विधी विभागाकडे पाठवण्यात आला असून, कायदेशीर प्रक्रिया कशी रेटली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर हे प्रकरणही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी घेणार विभागीय आयुक्तांची मुलाखत
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी लवकरच विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी भेट घेणार आहेत. त्यामधून या प्रकरणात पुढील कायदेशीर पावले कोणती असतील, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.