
जनता लाईव्ह :–आजच्या धावपळीच्या जीवनात, आरोग्य जपण्यासाठी अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जातात. काहीजण बाजारहाट, ऑफिसची कामं किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे रस्त्यावरून पायी प्रवास करतात. पण या साध्या वाटणाऱ्या कृतीतही मोठा धोका दडलेला आहे.तो म्हणजे अपघाताचा धोका.
गेल्या काही दिवसांत, शहरात किंवा ग्रामीण भागात रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांचा पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांचं विश्लेषण केलं तर एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. पादचाऱ्यांनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालण्याची सवय अंगीकारली असती, तर कदाचित या घटना टळल्या असत्या.
जेव्हा आपण वाहतुकीच्या दिशेने (म्हणजे वाहन ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने) चालतो, तेव्हा आपल्याला मागून येणाऱ्या वाहनाची गती, दिशा, आणि हेतू याची माहिती मिळत नाही. अचानक मागून एखादं दुचाकी, ट्रक किंवा चारचाकी वाहन आलं, तर अपघात टळण्याची शक्यता फारच कमी असते.
पण जर आपण विरुद्ध दिशेने, म्हणजे वाहने समोरून येतील अशा दिशेने चाललो, तर समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग आपल्या लक्षात येतो. वाहनाचा चालकही आपल्याला पाहू शकतो.गरज पडल्यास आपण पटकन बाजूला होऊ शकतो.
वाहन चालकाच्या चुकीमुळे कित्येक निरपराध पादचारी मृत्युमुखी पडतात. पण प्रत्येक वेळी दोष फक्त वाहन चालकाचाच असतो का.? आपण स्वतः किती सुरक्षित पद्धतीने चालतो हे देखील महत्त्वाचं आहे. थोडीशी सावधगिरी, थोडीशी शिस्त आणि योग्य सवय आपल्या जीवाला वाचवू शकते.
*आजच एक संकल्प करूया…*
*”मी पायी चालताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालेन.”*
हा संकल्प फक्त तुमचा नाही, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी देखील आहे. लहान मुलांना, वयोवृद्धांना, महिलांना आणि प्रत्येक पादचार्याला ही सवय लावण्याची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकावर आहे.
शेवटी एकच गोष्ट…
जीवन अनमोल आहे. काळजी घ्या. सावध रहा. सुरक्षित चाला.
ॲड. जमील देशपांडे
अध्यक्ष – मराठी प्रतिष्ठान,
जळगाव