
धक्कादायक अपघात : भरधाव वाहन चालकाने अनेकांना उडविले, महिला गंभीर जखमी
जळगाव – शहरातील महाबळ परिसरात गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगात कार चालवत असलेल्या वाहनचालकाने अनेक वाहनांना धडक दिली तसेच रस्त्याने चालत असलेल्या पादचाऱ्यांनाही उडवले. या अपघातात पार्वतीनगर येथील वंदना सुनील गुजराथी (वय ४९) या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, वाघ नगर येथील मोंटू शिवपाल सैनी (वय २६) हा आपल्या एमएच १९ ईपी १६९४ क्रमांकाच्या कारने भरधाव वेगात जात होता. महाबळ परिसरातील एका खासगी क्लासेसजवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे काही वाहनचालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढे जात असताना रस्त्याने चालत असलेल्या वंदना गुजराथी यांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर सैनी याने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील सतर्क नागरिकांनी पाठलाग करून त्याला कोल्हे हिल्स परिसरात पकडले. यावेळी जमावाने त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
रामानंद नगर पोलिसांनी सैनी याला अटक केली असून संबंधित कार जप्त करण्यात आली आहे. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.