
जळगाव, दि. १२ जून (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कानळदा-भोकर गटांतर्गत येणाऱ्या वडनगरी, फुपनगरी, खेडी, आव्हाणे आणि कानळदा या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाज बांधव व इतर मागासवर्गीय गरजू कुटुंबांकडे अद्यापही शिधापत्रिका (रेशनकार्ड) उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गोरख गुलाब गायकवाड यांनी वडनगरी येथे विशेष शिधापत्रिका नोंदणी कॅम्प आयोजित करण्याची मागणी केली आहे.
या समाजातील बहुतांश कुटुंबे ऊसतोडीसारख्या स्थलांतरित रोजगारामध्ये गुंतलेली असल्यामुळे वर्षातील ७-८ महिने बाहेरगावी असतात. त्यामुळे रेशनकार्डसारख्या अत्यावश्यक कागदपत्रांसाठी वेळेवर अर्ज करण्याची संधी त्यांना मिळत नाही. यामुळे मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंतच्या अनेक शासकीय लाभांपासून ते वंचित राहत आहेत.
गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, अनेक कुटुंबांकडे जुनी, जीर्ण शिधापत्रिका आहेत ज्यावर नाव स्पष्ट दिसत नाही. काही शिधापत्रिकांवर १२ अंकी क्रमांकच नाही, ज्यामुळे धान्य आणि मोफत आरोग्यसेवा योजनेचा लाभ मिळवता येत नाही. संबंधित कार्यालयाकडून आर्थिक मागण्या आणि विलंब यामुळेही या गरजू कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वडनगरी हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथेच कॅम्प घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी लागणारी सर्व शासकीय फी आणि इतर मदत स्थानिकांकडून देण्यात येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
सदर मागणीवर १५ दिवसांत निर्णय न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या अनुचित प्रकारास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या विषयाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर शिधापत्रिका कॅम्प आयोजित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.