
जळगाव, दि. ११ जून:
जळगाव शहरासह परिसरात आज सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. शहरात अनेक भागांमध्ये झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
विशेषतः जळगाव – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पॉलीटेक्निक कॉलेजपासून ते बांभोरी कॉलेजपर्यंतचा रस्ता झाडे कोसळल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाला आहे. या मार्गावर शेकडो वाहनांची रांग लागली असून वाहतूक कोंडीने सामान्य नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील रामानंदनगर, एमआयडीसी, शिवाजीनगर, रिंगरोड, वाघनगर, आय.टी.आय. परिसर, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसर अशा अनेक भागांमध्ये झाडे कोसळल्याची वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.
वादळाचा फटका केवळ रस्त्यांपुरता न राहता, नागरिकांच्या मालमत्तेलाही बसलेला आहे. शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून काही दुकानांचे शटर व छप्परही उचकटले गेले आहेत. काही ठिकाणी गाड्यांवर झाडे पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाल्याचीही नोंद आहे.
महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या सर्व नुकसानीचा सविस्तर पंचनामा व अहवाल प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उद्या (दि. १२ जून) प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करणार आहेत.
सध्या सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे व विजेच्या तारा अथवा झाडांच्या खाली जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या वादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे प्रशासन गांभीर्याने पाहत असून शक्य तितक्या लवकर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूचना: वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क 1077 या टोल फ्री क्रमांका वर संपर्क साधावा आणि अधिकृत पंचनाम्यासाठी सहकार्य करावे.