
जनता लाईव्ह:–जळगाव, २४ मे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला बाजूला ठेवून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
जळगाव शहरात एकूण ३३ स्थानिक व पर्यावरणपूरक प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, चिंच, सिताफळ, करंज, कदंब, इंग्रजी चिंच, फापडा या प्रकारच्या झाडांचा समावेश होता. उपक्रमाची विशेष बाब म्हणजे सर्व वृक्षारोपण श्रमदानातून करण्यात आले, जेणेकरून पर्यावरणाशी असलेली प्रत्यक्ष नाळ अधिक मजबूत होईल.
अमित ठाकरे यांच्या पर्यावरणाविषयी असलेल्या जाणिवेचा आदर राखत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे पर्यावरण संरक्षणाचा ठोस संदेश देण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा आणि निसर्ग संवर्धनाची प्रेरणा या माध्यमातून मिळाली.
या उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, श्रीकृष्ण मेंगडे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, साजन पाटील, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, संदीप मांडोळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ह्या उपक्रमातून एक आदर्श घालून दिला गेला आहे की, सामाजिक जबाबदारी जपत आणि पर्यावरणाचा विचार करूनही वाढदिवस साजरा करता येतो. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे शहरात हरितक्रांतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहचत आहे.