
जळगाव : छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असताना, काहींनी नाराजी दर्शवली. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी संतुलित आणि पक्षनिष्ठ भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे.
“कुछ खुशी, कुछ गमचं वातावरण”: संजय पवार
संजय पवार म्हणाले, “भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, खानदेशाच्या दृष्टीने विचार केल्यास अनिल भाईदास पाटील यांना संधी मिळायला हवी होती, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
जोडे मारो आंदोलनावर खंत गेल्या काही दिवसांत भुजबळ समर्थकांकडून अजित पवार यांच्या फोटोंवर “जोडे मारो” आंदोलन करण्यात आलं होतं. या घटनेबाबत संजय पवार यांनी स्पष्ट खंत व्यक्त करत म्हटलं, “अजितदादा हे आमचे नेते आहेत. त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने वागणे दुर्दैवी आहे. राजकारण बाजूला ठेवून शिस्त आणि संयम जपला पाहिजे. आम्हाला त्या घटनेचं खरंच दुःख आहे.”
भुजबळ साहेबांनी कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा होता
“भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपल्या समर्थकांना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त करायला हवं होतं. हे कुठेतरी थांबायला हवं होतं,” असेही संजय पवार यांनी नमूद केले.
अनिल दादांना पुन्हा संधी द्यावी
“अनिल दादा हे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात प्रचंड लोकप्रिय आणि जनतेशी थेट संपर्क असलेले नेते आहेत. पक्ष विस्तारासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे. यामध्ये काहीही चुकीचं नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षासाठी निष्ठा आणि संघटनाच महत्त्वाची
संजय पवार यांनी शेवटी स्पष्ट केले की, “अजितदादा यांचा पक्ष हा पुरोगामी विचारांचा आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. नाराजी असेलही, पण ती व्यक्त करून संघटनेच्या हितासाठी काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे.”