जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या रणधुमाळीत काही प्रभागांमधून एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या रेशन दुकानदारांची नावे एका आघाडीच्या वृत्तपत्रात “रेशनचोरी, अपहार आणि काळाबाजार” या आरोपांखाली झळकली होती, तेच चेहरे आज मतदारांच्या दारात उभे राहून लोकशाही, सेवा आणि प्रामाणिकपणाचे धडे देताना दिसत आहेत. काल ज्यांच्यावर जनतेच्या अन्नावर डल्ला मारल्याचे आरोप होते, तेच आज जनतेचा विश्वास मागत आहेत, ही बाबच लोकशाहीची शोकांतिका ठरत आहे.
गरीबांचे हक्काचे धान्य, ज्यावर हजारो कुटुंबांचे पोट अवलंबून असते, तेच धान्य दुकानातून गायब करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकण्याचे आरोप ज्यांच्यावर झाले, तेच आता स्वतःला “लोकसेवक” म्हणून सादर करत आहेत. हा केवळ विरोधाभास नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची थट्टा आहे. रेशन व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी आपली तिजोरी भरली आणि गरिबांच्या ताटात उपास ठेवला, ही वस्तुस्थिती समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे.
आजही शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि कामगार वस्तीमध्ये अनेक कुटुंबे रेशन दुकानासमोर रांगेत उभी राहून अपुऱ्या धान्यावर आपले आयुष्य ढकलत आहेत. अनेकांना महिन्याअखेर पुरेसे धान्य मिळत नाही, तर काहींच्या घरात उपाशीपोटी दिवस काढावे लागतात. पण याच व्यवस्थेतून धान्य चोरणारे आणि ‘बकासुर’ व्यापाऱ्यांना ते पुरवणारे लोक राजकीय संरक्षणाच्या छत्राखाली मिरवत प्रचार करत आहेत, ही बाब जळगावकर जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.
प्रश्न अत्यंत साधा पण गंभीर आहे गरिबांचा घास चोरणाऱ्यांना जळगावची जनता आपले अमूल्य मत देणार का? ज्यांनी उपाशी माणसाच्या ताटात हात घातला, ज्यांनी अन्नावर डल्ला मारला, त्यांनी नगरसेवकाच्या खुर्चीत बसण्याचे स्वप्न पाहावे का? लोकशाहीत सत्ता ही सेवेसाठी असते, लुटीसाठी नाही, हे मतदारांनी लक्षात घेणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे.
निवडणूक म्हणजे केवळ झेंडे, बॅनर आणि घोषणांची झुंबड नसते. ती नैतिकतेची, प्रामाणिकपणाची आणि लोकांवरील विश्वासाची खरी परीक्षा असते. काही प्रभागांमधील मतदारांनी आता ठरवायचे आहे की रेशनचोरांना लोकशाहीत स्थान द्यायचे की गरिबांच्या बाजूने उभे राहायचे. जळगावची जनता आज जागी आहे आणि यावेळी निकाल फक्त उमेदवाराचा नाही, तर न्यायाचा आणि नीतिमत्तेचाही असणार आहे.

unlocker.ai – The Ultimate AI Tool for Bypassing Restrictions and Unlocking Content Seamlessly!