जळगाव महापालिका : तिकीट कापल्याने भाजपमध्ये नाराजी, नाराज गटाची राजू मामांकडे तक्रार
जनता लाईव्ह :– मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शहरात आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पाटील कुटुंबीयांना भावनांचा आवेग अनावर झाल्याने रडू कोसळले, तर प्रश्नांच्या सरबत्तीमुळे विद्यमान आमदार भोळे काही काळ हतबल झाल्याचे चित्र उपस्थितांनी पाहिले.
या दरम्यान, पाटील कुटुंबीयांकडून उमेदवारी नाकारल्याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी संतप्त वातावरणात “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवलीत, तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल, मोठा त्रास सहन करावा लागेल,” असा इशारावजा सूरही ऐकायला मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षांतर्गत असंतोष उफाळून येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवक तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची तिकिटे कापण्यात आल्याने भाजपमधील एक गट उघडपणे नाराज झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट आमदार राजू मामा भोळे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. काही प्रभागांमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
विशेष म्हणजे, पक्षसंघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी अनुभवी नेतृत्व बाजूला सारल्याने निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये आजी-माजी नगरसेवकांची पकड मजबूत असून, त्यांचे तिकीट कापल्याने बंडखोरीचे सूर दबक्या आवाजात उमटू लागले आहेत.
वाढती नाराजी लक्षात घेता जळगाव शहरातील निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारी यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील एका हॉटेलमध्ये बैठका घेऊन नाराज घटकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत नाराज आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर, आमदार राजू मामा भोळे यांनीही पक्षातील नाराज घटकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, तिकीट वाटपाच्या निर्णयावर पक्षश्रेष्ठी ठाम राहतात की नाराजांची मनधरणी करून तोडगा काढला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना भाजपमधील ही अंतर्गत नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का, की नेतृत्व ती वेळीच शमवण्यात यशस्वी ठरणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
