जळगाव | विशेष प्रतिनिधी जळगाव शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा जरी मोठ्या गाजावाजात करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपाच्या मुद्द्यावर युतीत तीव्र मतभेद उफाळून आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
युतीच्या घोषणेनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रविवारी दुपारी पार पडलेली भाजप–शिवसेनेची महत्त्वाची बैठक अचानक फिस्कटल्याने या अपेक्षांवर पाणी फिरले. ही बैठक फिस्कटणे हे केवळ औपचारिक अपयश नसून, युतीतील अस्वस्थतेचे आणि अंतर्गत संघर्षाचे स्पष्ट लक्षण मानले जात आहे.
विशेष म्हणजे, बैठकीदरम्यान जागा कमी होणार असल्याची चर्चा सुरू होताच मंत्री गुलाबराव पाटील संतप्त होऊन बैठक सोडून निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे. पालकमंत्र्यांचा असा आक्रमक पवित्रा आणि बैठक अर्ध्यावर सोडणे, यामुळे युतीतील मतभेद आता पडद्यामागे न राहता उघडपणे समोर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महायुतीतील समन्वयाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, तसेच आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असूनही ठोस निर्णय न होणे आणि चर्चा अर्धवट राहणे, यामुळे युतीतील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. राजकीय निरीक्षकांच्या मते, ही बैठक फिस्कटणे म्हणजे केवळ जागावाटपाचा पेच नव्हे, तर विश्वासाच्या कमतरतेचे द्योतक आहे.
याआधी महायुतीकडून महापालिका निवडणुकीसाठी भाजप ५०, शिवसेना (शिंदे गट) २५ निवडणूक लढवणार, अशी चर्चा करण्यात आली होती. मात्र ही घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्षात आकडेमोड आणि तडजोडीवर एकमत होत नसल्याने, ही घोषणा केवळ कागदावरच मर्यादित राहिली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत महायुतीत भाजप ४६, शिवसेना (शिंदे गट) २३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ६, असे समीकरण जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, त्यानंतर भाजपकडून ५० पेक्षा कमी जागा घेण्यास नकार देण्याची भूमिका घेतली गेल्याने समीकरण पुन्हा बिघडले. भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेने दोन जागा कमी घेण्याची तयारी दर्शवल्यास ५०–२१–४ असे नवीन समीकरण पुढे आले.
तरीही, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर भाजप ५०, शिवसेना २० आणि राष्ट्रवादी ५ जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हा निर्णय अद्याप अधिकृत झालेला नसून, दोन ते तीन जागांवर अजूनही वाद कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, रात्री बैठक आटोपून गेलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “चर्चा सुरू आहे, दोन ते तीन जागांवर मतभेद आहेत, त्यातून मार्ग काढू,” असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम दूर होण्याऐवजी, युतीतील तणाव अधिकच अधोरेखित झाला आहे.
या साऱ्या घडामोडींमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या सक्रिय सहभागानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे भाजप अधिक आक्रमक भूमिकेत असल्याची चर्चा असून, त्यामुळेच जागावाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनल्याचे मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जळगावसारख्या महत्त्वाच्या शहरात महायुतीत निर्माण झालेला हा तिढा थेट निवडणूक रणनितीवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारा ठरू शकतो. एकीकडे युतीची औपचारिक घोषणा, तर दुसरीकडे बैठका फिस्कटणे, नेत्यांचा संतप्त होऊन बाहेर पडणे आणि सतत बदलणारी आकडेमोड, यामुळे युतीतील स्थैर्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकूणच, महायुतीतील मतभेद वेळीच मिटवले गेले नाहीत, तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव महापालिकेच्या राजकारणात आता युती टिकणार की तुटणार, अंतिम जागावाटपावर कधी शिक्कामोर्तब होणार, आणि हा तिढा मतदारांवर कोणता परिणाम करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
