जनता लाईव्ह :– जळगाव महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले की शहरात विकास, नागरी सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू व्हायला हवी. मात्र सध्या जळगावच्या राजकारणात विकासाऐवजी रात्रीच्या वेळेस चालणाऱ्या कॉर्नर मीटिंग्स, बंद दरवाजामागील सौदेबाजी आणि आयाराम–गयारामांच्या हालचाली अधिक चर्चेत आहेत. या सगळ्या घडामोडी जळगावच्या राजकारणाची दिशा नेमकी कुठे जात आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.
शहरात उमेदवारांची संख्या वाढत असतानाच बाहेरील तालुक्यातील काही व्यक्ती रात्रीच्या वेळेस विविध प्रभागांमध्ये बैठकांचा सपाटा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. शहराशी फारसा संबंध नसलेले, स्थानिक प्रश्नांची जाणीव नसलेले चेहरे अचानक ‘भावी नेतृत्व’ म्हणून पुढे येत आहेत. हे नेमकं कुणाच्या आशीर्वादाने घडत आहे आणि यामागचा अजेंडा काय, असा सवाल उपस्थित होतो.
जळगाव शहरात भाजप हा पक्ष मोठा मानला जातो, यात शंका नाही. मात्र आज याच पक्षात आयाराम–गयारामांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. कालपर्यंत एका पक्षात असलेले, आज दुसऱ्या पक्षात आणि उद्या तिसऱ्या पक्षात जाण्याची तयारी ठेवणाऱ्यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो राजकारणात निष्ठेला अजूनही काही किंमत उरली आहे का?
वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे, निवडणूक असो वा नसो जनतेशी जोडलेले राहणारे स्थानिक कार्यकर्ते आज बाजूला फेकले जात असल्याची भावना व्यक्त करत आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलून पक्ष वाढवणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेले आणि संधीसाधू चेहरे पुढे आणले जात असतील, तर ते राजकारण नसून स्थानिक कार्यकर्त्यांशी केलेला सरळसरळ विश्वासघात ठरतो.
याहून मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जळगाव शहराची जनता इतकी भोळी आहे का? बाहेरील तालुक्यातून येऊन अचानक शहराचे नेतृत्व करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना जळगावकर खरंच मतदान करतील का?
ज्यांनी शहराच्या प्रश्नांवर कधी आवाज उठवला नाही, जे कधी रस्त्यावर उतरले नाहीत, अशा लोकांच्या हाती शहराची सूत्रे देण्यास जनता तयार होईल का?
नेतेमंडळी अशा उमेदवारांसाठी मत मागताना नेमका कोणता मुद्दा जनतेसमोर ठेवणार आहेत?
अनुभव — की रात्रीच्या बैठकीत झालेली ‘जुळवाजुळव’?
महानगरपालिका म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नव्हे, तर शहर चालवण्याची मोठी जबाबदारी आहे. उमेदवारी देताना जर स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान झाला, त्यांना डावलले गेले, तर त्याचा रोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.
आज जळगावसमोर प्रश्न स्पष्ट आहे शहर चालवणार कोण?वर्षानुवर्षे संघर्षातून उभे राहिलेले स्थानिक कार्यकर्ते, की ‘रात्रीच्या खेळा’तून पुढे आलेले चेहरे? याचे उत्तर जळगावकर जनता योग्य वेळी देईल.

कार्यकर्ता ५०० रुपये रोज मध्ये मिळतो, मतदार तर १ रुपये रोजाने जळगावत मिळतो. त्यामुळे कोणीही ह्यांचं बाप होतो. वेश्यालय, सट्टा, गांजा, दारू, विकणारे,वाळूचोर, खुनाची शिक्षा झालेलं हे जळगावचे प्रथम नागरिक असतात. जळगावकरानं ते भुषणावह असते.