जनता लाईव्ह :– जळगाव शहरात भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप ५० तर शिवसेना २५ जागांवर लढणार असा निर्णय झाल्याची चर्चा समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जागावाटपाचा तिढा ठाकरे बंधू एकत्र येताच अचानक सुटतो हा केवळ योगायोग आहे का? की ठाकरे बंधूंच्या एकजुटीने सत्ताधाऱ्यांच्या गोटात धास्ती निर्माण झाली आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.
धास्ती कुणाला? आणि का?
ठाकरे बंधू एकत्र येताच अवघ्या काही तासांत जळगाव शहरात राजकीय हालचालींना वेग आला. बैठका, घाईघाईने होणारी वक्तव्ये आणि जागावाटपाची घाईघाईतील घोषणा पाहता विरोधकांच्या एकत्र येण्याचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर झाल्याचे स्पष्ट दिसून येते. हा खरोखरच आत्मविश्वास आहे की आतून वाढत चाललेल्या अस्वस्थतेचे लक्षण?
नियुक्त्या, वक्तव्ये आणि गोंधळ
एका बाजूला आमदार मंगेश चव्हाण यांची महानगरपालिकेसाठी प्रभारी म्हणून नेमणूक झाल्याची चर्चा, तर दुसऱ्या बाजूला जळगाव शहराचे स्थानिक आमदार राजू मामा भोळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली असतानाही कालचे चित्र मात्र गोंधळाचेच होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजप ५० आणि शिवसेना २५ जागांवर लढणार अशी स्पष्ट भूमिका मांडली.
मात्र प्रश्न कायम आहे
राजू मामा भोळे हे अधिकृत निवडणूक प्रमुख असताना माध्यमांशी संवाद साधण्याची भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांनी का घेतली?
प्रभारी आणि प्रमुख यांच्यातील अधिकारांची रेषा नेमकी कुठे आखलेली आहे?
राजू मामा भोळे गट नाराज?
कालच्या घडामोडींवर नजर टाकली असता आमदार राजू मामा भोळे यांची राजकीय कोंडी होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. याचे पडसाद त्यांच्या समर्थकांमध्येही उमटत असून, मामा समर्थक गटात नाराजीची कुजबुज सुरू झाली आहे.
दुसरीकडे, आमदार मंगेश चव्हाण माध्यमांशी संवाद, प्रभारीपदाची चर्चा आणि वाढती दृश्यता पाहता जळगाव शहरात भाजपमध्ये दोन स्पष्ट गट सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत.
राजू मामा भोळे समर्थक नाराज, हे चित्र भाजपसाठी संघटनात्मक बळ वाढवणारे आहे की अंतर्गत संघर्षाची नांदी?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने जळगावच्या राजकारणात केवळ खळबळ उडालेली नाही, तर सत्ताधारी पक्षातील अंतर्गत विसंवादही उघड झाला आहे. जागावाटपाचे गणित, परस्परविरोधी वक्तव्ये आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता पाहता येणारी महानगरपालिका निवडणूक ही केवळ विरोधकांविरुद्धची लढत नसून, सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत एकसंधतेचीही कसोटी ठरणार आहे.
जळगावात भाजप आधी विरोधकांना सामोरे जाणार की स्वतःच्या गटबाजीला?
