जळगाव : सिंगल यूज प्लास्टिकवर धडक कारवाई; ७ हजार रुपयांचा दंड
जनता लाईव्ह :– जळगाव महानगरपालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रशासन सतत कारवाई करत आहे. याच अनुषंगाने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी सोमाणी मार्केट, पिंप्राळा आणि कोंबडी बाजार परिसरात अचानक तपासणी मोहिम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक दुकानदारांकडे सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या विक्री व वापरात असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित दुकानदारांवर धडक कारवाई करत एकूण ₹७,००० इतका दंड आकारण्यात आला.
ही कारवाई आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार तसेच मा. सहायक आयुक्त (स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत प्रभाग समिती मुख्य समन्वयक तसेच मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, कुणाल बारसे, रुपेश भालेराव, मुकेश पाटील आणि स्वच्छता निरीक्षक महेश ठाकुर, प्रदीप धापसे मयूर सपकाळे यांनी यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.
सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते. न विघटनशील प्लास्टिकमुळे नाले तुंबणे, जलप्रदूषण, मातीची सुपीकता कमी होणे तसेच पक्षी व जनावरांचे जीव धोक्यात येणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिक आणि व्यवसायिकांनीही स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जळगाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने अशा प्रकारची कारवाई पुढील काळात अधिक कठोरतेने सुरू राहणार असल्याचे सांगितले असून, पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
