“नवे चेहरे की जुने मातब्बर..?”
जनता लाईव्ह :– काल महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांचे आरक्षण जाहीर झाले आणि आज सकाळपासून माध्यमांमध्ये जणू एकच सूर ऐकायला मिळाला “मातब्बरांना फटका नाही..! प्रस्थापित सर्व बाजूंनी सुरक्षित..!
विचार करायला लावणारं आहे हे. एवढं एकमत माध्यमांचं अचानक कसं झालं? कारण ही वाक्यं फक्त बातमी नसतात त्या विचार घडवणाऱ्या ओळी असतात. त्या वाचून प्रत्येक नव्या उमेदवाराच्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो “आमच्यासाठी जागाच उरली नाही का..?” आणि थोड्या वेळात दुसरा प्रश्नही मनात येतो “हे लोकशाहीचं मैदान आहे की ठरलेलं नाटकाचं रंगमंच?”
आज ‘मातब्बर’ हा शब्द सत्तेचं प्रतीक बनला आहे. ज्याने जनतेसाठी काम केलं प्रामाणिकपणे सेवा दिली त्यालाच खरा मातब्बर म्हणायला हवं होतं. पण आजच्या राजकारणात ‘मातब्बर’ म्हणजे ठरलेला चेहरा गटाचा नेता पुढच्या उमेदवारीचा हमीदार इतकंच समीकरण उरलं आहे. मग जनतेच्या मनातला खरा नेता कुठे हरवतोय?
“आयाराम-गयाराम” राजकारणात जुन्यांनाच ‘प्रस्थापित’ म्हणून पुन्हा पुढे करण्याची परंपरा बनली आहे. माध्यमं बातमी देतात की भूमिका घेतात हा प्रश्न इथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण जर माध्यमातूनच मतमतांतरे ठरवली जात असतील तर निवडणूक ही जनतेची राहिलीच कुठे?
लोकशाहीचं खऱ्या अर्थानं सौंदर्य म्हणजे नवे चेहरे नवे विचार नवी उमेद. जुन्यांकडे अनुभव आहे पण नव्यांकडे उत्साह आहे. या दोघांचा संगम झाला तरच विकासाचा प्रवास गतिमान राहतो. मात्र प्रत्येक निवडणुकीत तीच नावे तेच चेहरे तीच गटबाजी पाहिल्यावर लोकशाहीचा श्वासच अडखळतो.
बदल हा लोकशाहीचा प्राणवायू आहे आणि हा श्वास रोखण्याचा अधिकार कोणालाही नाही ना पक्षांना, ना प्रस्थापितांना,ना माध्यमांना.
