संभाजीनगर | प्रतिनिधी इतिहास, संस्कृती आणि करुणेचा संगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरात आज, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी, भव्य २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. देशभरातून हजारो बौद्ध अनुयायी, भिक्षुक आणि समाजबांधवांनी एकत्र येत धम्म, समता आणि मानवतेचा संदेश दिला.
या परिषदेला विशेष महत्त्व लाभले, कारण कोरियाचे माजी गव्हर्नर तसेच कोरियातील शेकडो बुद्ध भिक्षुक उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त झाले आणि भारतातील बौद्ध चळवळीचा जागतिक प्रभाव अधोरेखित झाला.
या मंगल प्रसंगी सकल बौद्ध समाज जळगाव जिल्हातर्फे अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. हजारो उपस्थितांना अन्न, केळी व पाण्याच्या बाटल्या वाटून जळगावकरांनी “भिक्षा नव्हे, सेवा हीच पूजा” या तत्त्वाचा प्रत्यय दिला.
या उपक्रमात सकल बौद्ध समाज जळगाव शहर तसेच बुद्धिस्ट क्रिकेट लीग (BCL) जळगाव चे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वयात अनेक कार्यकर्त्यांनी अनमोल योगदान दिले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे,
माजी अध्यक्ष व आजाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड,सचिव तुषार सोनवणे,कोषाध्यक्ष सचिन सरकटे सर,तसेच राजू डोंगरे, भारती रंधे, नीलू इंगळे, सागर अभिजीत रंधे, विक्रम रंधे, हरिओम सूर्यवंशी, गौरव गायकवाड, अहिरे सर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी “जयभीम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. या अन्नदान उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील बौद्ध समाजाची एकजूट, करुणा आणि सेवाभाव यांचा उज्ज्वल परिचय सर्व देशवासीयांसमोर आला.
