“विकास हवा, पण निष्ठा विकत घेतलेली नको!”
जळगाव प्रतिनिधी |स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर जळगावचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि दोन माजी महापौरांच्या भाजप प्रवेशानंतर, शहरातील गल्लीबोळात एकच चर्चा भाजपचं प्रवेशद्वार विरोधकांसाठी खुलं पण निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी बंद का?
शहरात सर्वत्र खड्डे महामार्गाची चाळण विकासाचा बोजवारा “माझा मामाचा विकास हरवला” म्हणणारेच आज भाजपमध्ये!
कालपर्यंत माझा मामाचा विकास हरवला म्हणून बॅनर झळकवणारेच आज मंत्र्यांचे पाय पडत भाजपच्या दारात प्रवेश घेत आहेत विकासावर प्रश्न विचारणारे चेहरे आज सत्तेच्या सावलीत विकासाचे दूत बनले आहेत. सोशल मीडियावर या दृश्यांवरून चर्चेचा स्फोट काही म्हणतात राजकीय शुद्धीकरण तर अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना उघड आम्ही वर्षानुवर्षे झटलो पण आज आमचा त्याग सतरंजीखाली गेला!
स्वच्छतेचा संदेश की राजकीय स्वार्थ भाजपने ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वर्षानुवर्षे हल्ले चढवले, त्याच विरोधकांना आज सद्गुणांच्या धुलाई मशीनमधून स्वच्छ करून पक्षात घेतले जाते! मतदारांचा प्रश्न थेट आणि तिखट पक्षात प्रवेश घेतल्यावर सर्व आरोप धुऊन निघतात का?सत्याच्या बाजूने जाण्याचा दावा करणारे आज सत्तेच्या बाजूने जाण्याची स्पर्धा करत आहेत. विकास हे आता मुद्दा राहिला नाही सत्ता मिळवणे हेच अंतिम ध्येय बनले आहे.
उद्धवसेनेपासून भाजपपर्यंत: निष्ठेचा प्रवास हरवलेला एकेकाळी शिवसेनेच्या झेंड्याखाली निष्ठेचा अभिमान मिरवणारे चेहरे आज भगव्या झेंड्याखाली सत्तेची सावली शोधत आहेत पक्षांतराची ही परंपरा जळगावात नवी नाही पण प्रश्न जुना पक्ष बदलतो पण विचारही का विकला जातो? खरे कार्यकर्ते मात्र आज कोपऱ्यात उभे राहून म्हणतात आम्ही पक्षासाठी झटलो पण आज नेते स्वतःसाठी धडपडताहेत!
भाजपसारख्या संघटनेचं खऱ्या अर्थानं बळ म्हणजे कार्यकर्त्यांची निष्ठा. पण आज तीच निष्ठा सत्तेच्या व्यवहारात हरवली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विरोधकही जर राजकीय शुद्धीकरणा च्या नावाखाली स्वीकारले जात असतील
तर हा विकास नव्हे फुगवटा आहे. जनतेची स्मृती कमी असते, असं राजकारणी समजतात पण मतदाराचा न्याय कठोर असतो त्याला चेहऱ्यांचे बदल दिसतात आवाजातील ढोंग ओळखता येतं. आज जळगावचा मतदार म्हणतो आम्हाला विकास हवा आहे, पण निष्ठा विकत घेतलेली नको!
कारण या राजकीय खेळात हरलेला फक्त एकच वर्ग आहे ती म्हणजे जनता.
