
जनता लाईव्ह :–जळगाव- आपले शहर सोन्याची बाजारपेठ आणि केळी साठी विख्यात आहे मात्र शहराचा विकास मात्र रोडावला आहे, उदासीनता आहे,ती दूर सारून महाराष्ट्रातील आदर्श शहर म्हणून पुढे यावे, अशी ठाम भूमिका आज रोटरी क्लब हॉल, मायादेवी नगर येथे झालेल्या “अराजकीय विचारमंथन बैठकीत” मांडण्यात आली. “जळगाव प्रथम” या घोषवाक्याने सुजाण व सुशिक्षित नागरिकांचे एकत्रित व्यासपीठ या बैठकीतून उभे राहिले.
या बैठकीचे आयोजन माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी शहरातील मान्यवर नागरिक, उद्योजक, समाजसेवक व सुज्ञ नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यातून या व्यासपीठाची निर्मिती झाली.
आज जळगाव शहरात औद्योगिक प्रगती आणि स्थैर्याचा अभाव. बेरोजगारीने शहरातील शिक्षित तरुण शहर सोडून जात आहेत. आपले खड्डेमय रस्ते आणि दर्जेदार पायाभूत सुविधांचा अभाव,सक्षम आरोग्य व्यवस्थेचा अभाव, स्वच्छ पाणीपुरवठा, जागोजागी मोकळ्या आणि हिरव्या जागा, प्लास्टिक मुक्ती व सार्वजनिक जागांचे संवर्धन,
शिस्तबद्ध व परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या मुद्द्यांवर सकारात्मक विचार मंथन करण्यात आले.
माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार गुरुमुख जगवानी, डॉ. सुरेश पाटील, व्यापारी महामंडळ प्रतिनिधी, वक्ते मनोज गोविंदवार, देवयानी गोविंदवार, दिलीप नारखेडे, डॉ पवन चांडक, रेडक्रॉस रक्तपेढीचे चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनीहे मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत गिरीश पाटील (योगी), गनी मेमन, डॉ. राधेश्याम चौधरी, शिवराम पाटील, ॲड. जमील देशपांडे, संग्राम सिंग पाटील आणि कैलास कासार, पृथ्वीराज सोनवणे, गजानन मालपुरे, यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यांनी जळगाव शहराला उत्तम नियोजन, स्वच्छता व सक्षम नागरी सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, हे शहर सर्वांना आपले वाटेल यासाठी उपाय केले पाहिजेत.
“जळगाव प्रथम” चा निर्धार
“स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुशिक्षित, निस्वार्थी प्रतिनिधी आवश्यक आहेत. शहराचा बदल केवळ तक्रारींनी नव्हे तर प्रामाणिक कृतीने साधता येईल.”
केवळ रस्ता, पाणी या मूलभूत प्रश्नांच्या पलिकडे दूरदृष्टीने विचार करून शहराच्या शाश्वत विकासाठी उपाययोजना करणे.
शहरातील प्रश्नासाठी शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय दबावगटाची भूमिका बजावणार
शहरातील संवेदनशील आणि शहरप्रेमी नागरिकांच्या एकत्रीकरणाचे माध्यम बनणे.
पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सक्रीय नागरिकत्व अशा मुद्यांवर शहरासाठी जनचळवळ उभी करणे
बैठकीस डॉक्टर, वकील, उद्योजक, प्राध्यापक, शिक्षक, महिला व तरुणवर्ग अशा सर्व स्तरांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीचे प्रास्ताविक ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
बैठकीच्या अखेरीस असा निर्धार व्यक्त झाला की, “जळगाव प्रथम” हे व्यासपीठ केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलेल आणि महाराष्ट्रात जळगावचे नाव एक आदर्श शहर म्हणून अभिमानाने घेतले जाईल.