
जळगाव : जन्मतः पाय वाकडे (क्लबफूट) असलेल्या लहान मुलांसाठी दिलासादायक बातमी आहे. क्युअर इंटरनॅशनल इंडिया आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अशा मुलांवर पूर्णपणे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमाचे समन्वयक म्हणून सुवर्णा भालचंद्र सपकाळे कार्यरत असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक 88000 20501 किंवा ई-मेल mh.jalgaoncivil@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्लबफूट हा जन्मजात विकार असून यात बाळाचे पाय आत वाकडे असतात. या आजारामुळे मुलांच्या चालण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. भारतात दरवर्षी सुमारे ५० हजारांहून अधिक बालकांचा जन्म या विकारासह होतो.
या आजारावर ‘पोन्सेटी पद्धत’ सर्वात प्रभावी मानली जाते. या उपचारपद्धतीत दर आठवड्याला पायावर प्लास्टर लावून हळूहळू पाय सरळ केला जातो. साधारणपणे पाच ते सहा आठवड्यांत पाय योग्य स्थितीत येतो. त्यानंतर विशेष ब्रेसचा वापर करून ही स्थिती कायम ठेवली जाते. हा उपचार सुरक्षित, दुखीविरहित आणि शस्त्रक्रियाविरहित आहे.
लवकर उपचार झाल्यास बाळ सहज चालू लागते, शारीरिक अपंगत्व टळते आणि भविष्यात मोठ्या शस्त्रक्रियांची गरज राहत नाही. यामुळे कुटुंबावर आर्थिक भारही पडत नाही.
जळगाव जिल्ह्यातील पालकांना आता उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : सुवर्णा भालचंद्र सपकाळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, मो. 88000 15590 / 88000 20522.