
जळगाव महापालिकेत पुन्हा लाचखोरीचा सापळा आरोग्य विभागातील अधिकाऱ्याला लाजवेल अशा सुसज्ज केबिनमध्ये लिपिक रंगेहात पकडला…
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका आणि भ्रष्टाचार — हे समीकरण आता नागरिकांच्या मनात घट्ट रूजले आहे. सेवा, पारदर्शकता, प्रामाणिकपणा या शब्दांचा पत्ता नाही; उलट लाचखोरी, उकळपट्टी आणि ACBच्या धडक कारवायांचीच मालिका सुरू आहे.
मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट 2025) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुन्हा एकदा धडक कारवाई करून दोन कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या. लिपिक आनंद चांदेकर आणि कंत्राटी कर्मचारी राजेश पाटील यांनी नागरिकांकडून हक्काची ₹5,000/- लाच मागून स्वीकारल्याच्या गुन्ह्यात अटक झाली.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यालाही लाजवेल अशा आलिशान केबिनमध्ये झालेली ही घटना थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवण्यात आलेला आहे परंतु सध्या कॅमेरा हा बंद स्थितीत आढळून आलेला आहे.
🚨 लज्जास्पद आणि धक्कादायक
सहा महिन्यांत दुसऱ्यांदा ACBला महापालिकेत सापळा रचावा लागणे ही केवळ दोन व्यक्तींची चूक नाही. ही संपूर्ण यंत्रणेत खोलवर शिरलेल्या भ्रष्टाचाराची नाळ आहे. प्रत्येक साध्या कामासाठी नागरिकांना त्रास, अडथळे आणि पैशांची उकळपट्टी करावी लागते.
❓ नागरिकांचे अनुत्तरित प्रश्न हक्काची रक्कम परत मिळवण्यासाठीही नागरिकांना लाच का द्यावी लागते?
सलग दोन कारवाया होऊनही वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी गप्प का आहेत?या लाचखोरीच्या खेळामागे कुणाचा वरदहस्त आहे?
⚡ संपादकीय भूमिका महापालिकेतील भ्रष्टाचार आता फक्त “गोष्टी” किंवा “तक्रारी” राहिलेल्या नाहीत. सलग सहा महिन्यात दोन ACB कारवाया म्हणजेच थेट प्रशासनासाठी चपराक आहे. पण फक्त आरोपींना अटक करून प्रश्न सुटत नाही. राजकीय इच्छाशक्ती, जबाबदारी निश्चिती आणि शिस्तबद्ध कारवाई याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही.
नागरिकांना सेवा द्यायची जबाबदारी असलेलेच जर जनतेची लूट करत असतील तर हा लोकशाहीचा उपहास आहे. महापालिकेतील या घोटाळ्यांची मुळापर्यंत चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, जळगाव महानगरपालिकेला लवकरच “लाचखोरीचे मुख्यालय” अशी ओळख कायमची चिकटेल.