
नवी दिल्ली – आरोग्य क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या परिचारिका व परिचारकांना गौरविण्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार यंदा देशभरातील 15 सेवकांना प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागूल यांचा गौरव करण्यात आला आहे.
हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एhttps://youtu.be/qb5zqVpC7F4का भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे पार पडला. या समारंभात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल यांच्यासह आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सहायक परिचारिका सुजाता बागूल यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी अतिशय समर्पितपणे कार्य केले आहे. बालकांचे लसीकरण, गरोदर महिलांची तपासणी, प्रसूती सेवा, आजारांबाबत जनजागृती, आणि कोविड काळातील योगदान अशा विविध स्तरांवर त्यांनी आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार हे परिचारिका क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मानले जातात. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात. फ्लोरेन्स नाइटिंगेल या आधुनिक परिचारिकेच्या कार्याची आठवण म्हणून या पुरस्काराचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.
सर्वोच्च पातळीवर मिळालेला हा सन्मान म्हणजे सुजाता बागूल यांच्या कार्याची अधिकृत पावती आहे. जळगाव जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. त्यांच्या कार्यातून इतर आरोग्यसेवकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.