भ्रष्टाचार

मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता; काम न करता पगार घेणाऱ्यांवर गंभीर आरोप..

जळगाव (प्रतिनिधी) यांत्रिकी विभागाच्या अधिपत्याखालील पथक जळगाव अंतर्गत कार्यरत असलेला यांत्रिकी उपविभाग, जामनेर — जो सध्या वाघुर कॉलनी, नशिराबाद ता. जि. जळगाव येथे कार्यरत आहे — या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शासकीय नियमानुसार मुख्यालयात वास्तव्यास राहणे बंधनकारक असतानाही, प्रत्यक्षात ते मुख्यालयात राहत नाहीत. तरीही सर्व कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

या कार्यालयातील एक कनिष्ठ लिपिक वगळता इतर सर्व उपविभागीय अभियंता, अभियंते व कार्यालयीन कर्मचारी मुख्यालयाच्या बाहेर राहतात. असे असूनही शासकीय नियमांना बगल देत त्यांना नियमितपणे घरभाडे भत्ता दिला जात आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप होत आहे.

 

याशिवाय या कार्यालयातील अनेक क्षेत्रीय कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात कामावर न जाता केवळ उपस्थिती दाखवून पगार घेत असल्याची बाब देखील उघड झाली आहे. म्हणजेच, प्रत्यक्ष काम न करता शासकीय वेतन घेतले जात असल्याचे दिसून येत आहे, जे अधिक चिंताजनक आहे.

 

या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक बोजा पडत असून, प्रामाणिक करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. संबंधित वरिष्ठ यंत्रणांनी याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button